पुणे (वृत्तसंस्था) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काल विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आले असता त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आली. यावर आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस आले असताना हा प्रकार घडला आहे. या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रोहित पवार ट्विट करत की, ”विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचं समजतंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग आहेत. पण त्याऐवजी चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही,” असं रोहित पवार म्हणाले.