जळगाव (प्रतिनिधी) : समाजात सामूहिक विवाह सोहळे होणे गरजेचे आहे. विवाह सोहळात होणारा अनाठायी खर्च टाळण्यासाठी पत्रिका छापणे बंद करून केवळ व्हाट्सअप वर पाठवा. दिलेल्या वेळेवर लग्न लावा. मुला-मुलींनी जीवनसाथीकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे बंद करा असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ, जळगाव यांच्या वतीने जळगाव शहरात भव्य वधु वर परिचय मेळावा रविवार दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी “शांताराम नारायण चौधरी नगर” खान्देश सेंट्रल परिसरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गुलाबराव पाटील हे बोलत होते. मंचावर तेली समाजाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी माजी आ. शिरीष चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर सीमाताई भोळे, नितीन लढ्ढा, मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, शांताराम चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सिंधुताई चौधरी, महिला मंडळाध्यक्ष प्रमिला चौधरी आदी उपस्थित होते.
सुरुवातीला संत शिरोमणी कडोजी महाराज आणि संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमांचे मान्यवरांनी पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रस्तावनेमधून अनिल पाटील यांनी मेळाव्याविषयी माहिती सांगितली. तसेच तेली समाजाच्या प्रगतीविषयी माहिती दिली. वधू-वर परिचय पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यानंतर प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले की, पूर्वी नातेवाईकांनी स्थळ ठरवण्याची पद्धत होती. मात्र आज मुले स्वतःचे जोडीदार ठरवतात. गतिमान जगामध्ये बदलत्या काळानुसार आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन करावे लागेल. जीवनसाथी निवडताना केवळ पैशांची श्रीमंती न पाहता तो किती सद्गुणी आहे ते देखील पाहणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.
माजी आ. शिरीष चौधरी यांनी, साखरपुडा पद्धत बंद व्हायला पाहिजे अशी मागणी मनोगतमधून व्यक्त करून वधू-वरांच्या अनाठायी अपेक्षांमुळे त्यांचे विवाह करण्याचे वय निघून जात आहे याकडे लक्ष वेधले. तसेच पॅकेज पद्धती चुकीच्या असून वर्तमानात किरकोळ कारणांवरून फारकती वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. जोडीदार पाहताना होतकरू, सद्गुणी, निर्व्यसनी असा पहा. डी.जे. व प्री-वेडिंग शूटिंग बंद करा असेही त्यांनी समाजबांधवांना आवाहन केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, सर्वच समाजामध्ये मुलींची कमतरता आहे हे वास्तव सांगून समाजात मुली आहेत पण देणाऱ्यांची अपेक्षा मात्र वाढत चालल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत याकडे लक्ष वेधले. जर मुलांमध्ये गुण असेल तर झोपडपट्टीतला देखील जिल्हाधिकारी होतो हे वास्तव समाजामध्ये आहे. वेळेवर लग्न लागणे ही काळाची गरज असून प्रत्येक समाजामध्ये पत्रिका छापणे बंद करून केवळ व्हाट्सअपवर आमंत्रण दिले पाहिजे. शेतकरी मुलांना मुली नकार देतात. याबद्दल मला खेद वाटतो. पण जर आधुनिक शेती करणारा असेल, सद्गुणी, निर्व्यसनी असेल तर नक्कीच मुलीने विचार करावा असे देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
यावेळी संतोष चौधरी, ॲड.महेंद्र सोमा चौधरी, भागवत चौधरी, रामचंद्र चौधरी, सुभाष भाग्यवंत, रामेश्वर चौधरी, डॉ. वसंतराव भोलाणे, नामदेवराव चौधरी, श्रीराम चव्हाण, सुभाष चौधरी, प्रशांत सुरळकर आदी समाजातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले तर आभार दशरथ चौधरी यांनी मानले. कार्यक्रमासाठी तेली समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.














