मुक्ताईनगर (प्रतिनिधी) गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेती संपन्न ग्रामीण भागातून जाणारा अंकलेश्वर – बुऱ्हानपूर राज्यमार्गाचे अखेर राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्याचे रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने राजपत्राद्वारे जाहीर केले.
सदर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होण्यासाठी रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षाताई खडसे ह्या मागील ७ वर्षापासून वेळोवेळी पाठपुरावा करून प्रयत्न करीत होत्या. अखेर पाठपुराव्यास यश आल्याने खासदार रक्षाताई खडसेंनी आनंद व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.
४ फेब्रुवारी रोजी खासदार रक्षाताई खडसेंनी रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव गिरधर अरमाने यांची भेट घेतली होती, त्यावेळी त्यांनी राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्याचे तसेच रस्त्याचे अवलोकन करून कमीतकमी दोन पदरी सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचे खासदार खडसे यांना आश्वासन दिले होते. अंकलेश्वर – बुऱ्हानपूर हा राज्यमार्ग असल्यामुळे सदर रस्त्याच्या दुरुस्ती व सुधारणेस राज्यांकडून मिळणाऱ्या निधीच्या कमतरतेमुळे बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे सदर रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झालेली होती. परंतु सदर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्याने केंद्रामार्फत अत्याधुनिक पद्धतीने सुधारणा व दुरुस्ती करणेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल.
सदर तळोदा – शहादा – शिरपूर – चोपडा – यावल – रावेर – बुऱ्हानपूर अशा एकूण २४० किमी राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले आहे. तसेच लवकरात लवकर खासदार रक्षाताई खडसे या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना भेटून सदर महामार्गाचे काम मार्गी लागण्यासंदर्भात मागणी करणार आहे. अशी माहिती खासदार कार्यालय मुक्ताईनगर यांचे कडून देण्यात आली.