अहमदनगर (वृत्तसंस्था) माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती यात्रेच्या स्वागतानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंडे यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन साखळी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती यात्रेच्या स्वागतानिमित्त गत आठवड्यात जामखेड येथील खर्डा चौकात स्वागत कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांच्या गळयातील अडीच तोळे वजनाची सोनसाखळीची चोरी झाली होती. याप्रकरणी सुहास दादासाहेब वारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तात्काळ तपासचक्र फिरवीत खर्डा चौक येथे गर्दीमध्ये लोकांचे खिसे, पाकीट चाचपडताना दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवत त्यांनी त्यांची नावे दत्ता ज्ञानेश्वर गुंजाळ, अशोक बबन जाधव (दोघे रा. पेठ बीड, ता. जि. बीड), असे सांगत गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली अडीच तोळे वजनाची सोनसाखळी हस्तगत केली आहे.
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. दोघांवर विविध पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, प्रवीण इंगळे, अविनाश ढेरे, संतोष कोपनर, प्रकाश मांडगे, देविदास पळसे, कुलदिप घोळवे, प्रकाश जाधव यांनी केली आहे. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.