जळगाव (प्रतिनिधी) खून, दरोडा, जबरी चोरी, मारामारी, प्राणघातक हल्ला या सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले भूषण उर्फ भासा विजय माळी व सचिन उर्फ टीचकुल कैलास चौधरी (दोन्ही रा.तुकारामवाडी) या दोघांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे खुनाच्या गुन्ह्यात जामीन झाल्यावर कारागृहातून बाहेर पडताच आज (मंगळवार) पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी हे आदेश काढले. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी लागलीच दोघांना शहराच्या हद्दीबाहेर रवाना केले.
भूषण माळी हा टोळी प्रमुख असून सचिन हा त्याचा साथीदार आहे. या दोघांच्या टोळीने शहरात खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला व मारामारी यासारखे गुन्हे केलेले आहेत. भूषण याच्यावर खुनाचे २, दरोडा, जबरी चोरी, मारामारी व अवैध शस्त्रे बाळगणे यासारखे १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत तर सचिन याच्याविरुध्द खुनाचा १, प्राणघातक हल्ला व मारामारी यासारखे ७ गुन्हे दाखल आहेत. एवढेच नव्हे तर षण माळी, सचिन चौधरी व त्याच्या सहकाऱ्यांनी १८ मार्च रोजी शासकीय रुग्णालयाच्या आवारात सूरज विजय ओतारी याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केला होता.
या गुन्ह्यात दोघं जण कारागृहात होते. दोन दिवसापूर्वी सचिन याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तर मंगळवारी भूषणची जामीनावर कारागृहातून सुटका झाली. परंतु कारागृहातून बाहेर पडताच पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे स्वत:च्या अधिकारात भूषण व सचिन या दोघांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले. त्यानुसार सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील व साईनाथ मुंढे यांनी दोघांना बुधवारी हद्दपारीची नोटीस बजावून शहराबाहेर रवाना केले. तत्पूर्वी दोघांना हद्दपार करण्याबाबत पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला होता.