मुंबई (वृत्तसंस्था) उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला आम्ही उत्तर देणार नाहीत. त्यांच्या वक्तव्यांवर उत्तर द्यायचं की नाही याबाबत एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील,असं शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची पक्ष नेतेपदावरुन हाकालपट्टी केल्याच्या विरोधात आम्ही कोर्टात आव्हान देऊ, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. गोव्यात त्यांनी पत्रकारांशी आज संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
केसरकर पुढे म्हणाले की, आम्ही कोणतंही सेलिब्रेशन करणार नाहीत. विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतरही आम्ही सेलिब्रेशन करणार नाहीत, असं केसरकर म्हणाले. आमचे उद्धव ठाकरे नेते आहेत. त्यांच्यासोबत भावना जोडलेल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस जवळचे वाटत असतील तर हा भ्रम कधीतरी दूर होईल, असंही केसरकर म्हणाले.
केसरकर पुढे म्हणाले, शिवसेना पक्षाच्यावतीनं असं सांगण्यात आलं आहे की, पक्षनेते पदावरुन एकनाथ शिंदे यांना काढण्यात आलं आहे. यासाठी जे पत्र किंवा नोटीस शिंदेंना देण्यात आली आहे, ती आक्षेप घेण्याजोगी असून त्याचं रितसर उत्तर आधी आम्ही पाठवू त्यानंतर या कारवाईत बदल झाला नाही तर त्यावर आम्ही आवश्यक ती कायदेशीर कारवाई करु. सभागृहाच्या नेत्याचा अपमान होतो तेव्हा हक्कभंग येतो. इतकं हे पद महत्वाचं आहे, असं केसरकर यांनी यावेळी म्हटलं.
एकनाथ शिंदेंना नेते पदावरुन काढण्यात आल्याचा निर्णय चुकीचा असल्याचा आमचा दावा असून त्याला आव्हान देण्यात आलं आहे. तसेच शिवसेनेच्या १२ आमदारांच्या निलंबनासंदर्भात जी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती, त्यावर लवकर सुनावणी घेण्याची विनंती फेटाळून लावल्याचं आपल्याला माहिती आहे. त्यामुळं अशी कृत्ये लोकशाहीला शोभणारे नाहीत, असंही केसरकर पत्रकार परिषदेत म्हणाले.
शिवसेनेच्या स्वाक्षरी मोहिमेवर बोलताना केसरकर म्हणाले की, 20 रुपयांचा वडापाव खाणाऱ्यांना 100 रुपयांचं प्रतिज्ञापत्र का? पक्षात राहण्यासाठी प्रतिज्ञापत्र नव्हे तर प्रेमाचं बंधन हवं, शिवबंधन हेच प्रेमाचं बंधन आहे, असं केसरकर म्हणाले. आम्ही शिवबंधन आज सुद्धा घालतो. शिवबंधन बाळासाहेब ठाकरे यांची आठवण म्हणून घालतो. आम्ही खरे सैनिक आहोत. आम्ही सर्व कार्यकर्त्याना सांगू इच्छितो असे अॅफिडेबिट केल्यानंतर काहीही होत नाही, असंही केसरकरांनी सांगितलं.