नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केजरीवाल यांना पाठिंबा दिला. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीसुद्धा सदिच्छा भेट घेतली.
उद्धव ठाकरे व सुनीता केजरीवाल यांच्या भेटीची माहिती आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांनी पत्रकारांना सांगितली. उद्धव ठाकरे व त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते संजय राऊत केजरीवालांच्या घरी आले. त्यांनी केजरीवालांची पत्नी सुनीता, आई- वडील व मुलांची भेट घेतली. सध्याच्या कठीण काळात आम्ही केजरीवाल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही उद्धव यांनी दिली तसेच उद्धव ठाकरे व केजरीवाल परिवाराने देशातील सध्याची परिस्थिती व हुकूमशाही प्रवृत्तीच्या सरकारवर चर्चा केली, असे संजय सिंह म्हणाले.
कनिष्ठ न्यायालयाने अरविंद के जरीवाल यांना जामीन मंजूर केला. यासंबंधित आदेश जाहीर होण्याच्या आत त्यास वरिष्ठ न्यायालयाने स्थगिती दिली. इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. एवढेच नव्हे, तर सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना पुन्हा अटक केली. केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचा (सीबीआय) शस्त्र म्हणून गैरवापर करत असल्याचा आरोप सिंह यांनी केला. आम्ही हुकूमशाहीविरोधात एकजुटीने आवाज बुलंद करणार असल्याचे आम आदमी पक्षाने स्पष्ट केले.