विरार (वृत्तसंस्था) विरारमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत शॉक लागून दोन भीमसैनिकांचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत अन्य तीन जण गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विरारच्या कारगिलनगरमध्ये गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
विरार येथील कारगिल नगर परीसरात गुरुवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री दहा वाजेच्या सुमारास कारगिल चौकातून मिरवणूक संपवून कार्यकर्ते घरी परतत होते. त्यावेळी मिरवणूक वाहनावर (ट्रॉली) ६ जण उभे होते. याचवेळी वाहनावरील लोखंडी रॉडचा रस्त्यावर असलेल्या रोहित्राला स्पर्श झाल्यामुळे रोहित्रामधील वीजप्रवाह संपूर्ण ट्रॉलीमध्ये पसरला. त्यामुळे वाहनावरील सहा जण होरपळले. या दुर्घटनेत रुपेश सुर्वे (३०) आणि सुमित सुत (२३) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ४ जण जखमी झाले. त्यातील उमेश कनोजिया (१८). राहुल जगताप (१८), सत्यनारायण (२३) ३ गंभीर जखमींना मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्मित कांबळे (३२) या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.











