जळगाव (प्रतिनिधी) ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली या कामगिरीमुळे भारतीयांना जवळपास १०० वर्षानंतर सुवर्णपदक मिळाले या सुवर्णक्षणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार समितीचे सदस्य अशोक जैन व जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी हा विजय सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आपल्या संघाने साधलेला अपूर्व यश हा भारताच्या बुद्धिबळ इतिहासात एक सुवर्णक्षण ठरला आहे. आपल्या खेळाडूंनी दाखवलेली परिपूर्ण खेळतंत्र, मानसिक सबलता, आणि जिद्द यामुळे भारताचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा एकदा उज्वल झाले आहे. भारतीय बुद्धिबळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक हे महत्त्वाचे पाऊल आहे. या विजयामुळे भारत बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय मंचावर एक अग्रगण्य शक्ती बनत आहे, आणि हे यश आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत अशोकभाऊ जैन यांनी व्यक्त केले. जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी सांगितले की, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताचा नेत्रदीपक विजय हा देशासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे.
दोन्ही संघांनी पुरुष आणि महिला अत्यंत चांगली कामगिरी केली. भारतीय बुद्धिबळपटूंनी आपली प्रतिभा तर सिद्ध केलीच, पण मानसिक कणखरपणा आणि सांघिक कार्यातून हे सिद्ध केले की भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती बनला आहे असे ते म्हणाले. या दोन भारतीय संघांच्या विजयावरून देशातील बुद्धिबळाची पातळी सातत्याने वाढत असून, भारतीय खेळाडूंमध्ये विश्वविजेते बनण्याची क्षमता असल्याचे दिसून येते. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील ही कामगिरी येणाऱ्या पिढीलाही प्रेरणादायी ठरेल असे ही ते म्हणाले.