मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यासारखे नेते आपल्या खिशात असल्याचं वक्तव्य केलं. यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. चंद्रकांत पाटील मला कधी खिशात टाकताय याची वाट पाहतोय, मग मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांना एका पत्रकाराने नवाब मलिक यांच्या समीर वानखेडेंवरील टीकेबाबत विचारलं होतं. त्यावेळी नवाब मलिकांसारखे लोक आम्ही खिशात ठेवतो असं वक्तव्य केलं होतं. पाटील यांच्या या वक्तव्यावर आता मलिकांनी प्रत्युत्तर दिलंय. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात की नवाब मलिक सारख्याला मी खिशात ठेवतो. त्यांचा खिसा एवढा मोठा आहे हे मला माहिती नव्हतं. मी वाट पाहतोय की त्यांनी आपल्या मोठ्या खिशात मला टाकावं. मी पाहिल त्यांच्या खिशात काय काय आहे आणि बाहेर येऊन जनतेला सांगेन. त्यांचा एवढा मोठा खिसा असेल तर लवकरात लवकर त्यांनी मला खिशात टाकावं मी वाट पाहतोय, असं प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांना दिलंय.
चंद्रकांत पाटील यांनी मर्यादा ठेवून बोलायला हवं – धनंजय मुंडे
चंद्रकांत पाटील यांना अशी भाषा शोभत नाही. चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत किंवा भाजपच्या कुठल्याच राज्य किंवा केंद्रातील नेत्यांचे खिसे मोठे नाहीत. ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलायला हवं, अशा शब्दात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.