धुळे (प्रतिनिधी) समीर वानखेडे यांना शिरपूर तालुक्यातील १५०० एकरावरील गांजाची माहिती दिली होती. पण त्यावर काहीच कारवाई झाली नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. भाजपचे आमदार काशिराम पावरा यांच्या गावात ५०० एकरावर गांजा होता, असा आरोपही त्यांनी केलाय.
गोटे म्हणाले, शिरपूर तालुक्यात १५०० एकर जमिनीवर गांजा लावला होता. याची तक्रार मी स्वत: समीर वानखेडे यांच्याकडे केली होती. त्याचे व्हिडीओ शुटिंग ड्रोनद्वारे केले होते. छायाचित्र त्यांच्याकडे पाठवली. नावासकट सगळी माहिती पाठवली होती. पण त्यात काहीही केले नाही. भारती सिंग यांच्याकडे ८६ ग्रॅम गांजा सापडला म्हणून त्यांना अटक केली. जिथे हजारो टन गांजा आहे, तिथे कुणीच लक्ष दिलं नाही. कारण तिथं काही मिळालं नसतं. सेलिब्रिटी असतील तर काही पैसे मिळतात, असा आरोपही गोटे यांनी केला.
कालांतराने कळाले, की इथे काही लोक इथे येऊन गेले. पण काही जप्त केले नाही. त्यानंतर धुळे जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी एका ठिकाणी कारवाई करून एक ट्रक गांजा जप्त केला. भाजपचे आमदार काशिराम पावरा यांच्या गावात वन विभागाची ५०० एकर झाडे तोडून गांजा लावला होता, असा दावा गोटे यांनी केला आहे. जिथे भाजपचे आमदार तिथेच कसा गांजा लागतो, असा सवाल गोटे यांनी उपस्थित केला. काशिराम पावरा यांच्या सख्या बहिणी तिथे सरपंच आहेत. शेतात काय लावले, हे तलाठी, ग्रामविकास पोलिस पाटील यांना कळते. शहादा आणि शिरपूरमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. सुनिल पाटील याचा संबंध ते जोडत असतील तर आम्ही भाजपचे आमदार गांजा लावतात, असे आम्ही म्हणायचे का, असा सवालही गोटे यांनी उपस्थित केला.