अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्र. ८ मध्ये वाढत्या अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभागातील साफसफाई करून फवारणी करण्यात यावी तसेच बीएससी पावडर टाकावी, अशी मागणी नगरसेवक सचिन पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरसेवक सचिन पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रभागातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असून आरोग्य विभागाला तोंडी सूचना देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, द्वारका नगर परिसरात एक डेंग्यूचा रुग्ण आढळून आला असून इतर गल्ल्यांमध्ये तीन मलेरियाचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रभागात घाणीचे साम्राज्य वाढल्यामुळे डास-मच्छर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका टाळण्यासाठी प्रभाग क्र. ८ मध्ये तातडीने साफसफाई मोहीम राबवून फवारणी करावी तसेच बीएससी पावडर टाकण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक सचिन पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.











