जळगाव (प्रतिनिधी) गेल्या ६ वर्षापासून भारत पेट्रोलियममध्ये कामगारांच्या वेतन वाढीच्या कोणताही करार झालेला नाही. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र माथाडी इतर श्रमजीवी असंरक्षित व असंघटीत कामगार संघटनेचे अध्यक्ष ॲड.जमील देशपांडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्री.भारदे यांची भेट घेत निवेदनाद्वारे कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ॲड.जमील देशपांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या संघटनेचे सदस्य माथाडी मंडळात नोंदणीकृत कामगार असून माथाडी मंडळाच्या माध्यमातून गेल्या १७ वर्षापासून भारत पेट्रोलियम एमआयडीसी जळगाव येथे घरगुती सिलेंडर लोडींग अनलोडींगचे काम करतात.भारत पेट्रोलियम येथे माथाडी कायदा लागू आहे. माथाडी नियमानुसार कामगारांच्या वेतन वाढीबाबत दर तीन वर्षांनी करार करण्याचा नियम आहे.भारत पेट्रोलियम येथे सिलेंडर वाहतुक करणारे ट्रक ठेकेदार यांच्या सोबत सदर करार केला जातो.
दरम्यान गेल्या ६ वर्षापासून कामगारांच्या वेतन वाढीच्या कोणताही करार झालेला नाही. याबाबत संघटनेमार्फत माथाडी मंडळाला पत्र दिले असता माथाडी मंडळाने ट्रक ठेकेदार व कामगार यांची बैठक दि.२ मे २०२३ रोजी आयोजित केली होती. त्या बैठकीला ठेकेदार उपस्थित राहिले नाही. माथाडी नियमानुसार भारत पेट्रोलियम हे प्रिन्सीपल ओनर आहेत. याबाबत त्यांनी पुढाकार घ्यावा हे अपेक्षीत आहे. मात्र त्यांच्याकडूनही नेहमी टाळाटाळ केली जात आहे. प्रचंड वाढलेला महागाई यामुळे सहा वर्षापुर्वीच्या वेतनावर कामगारांना काम करणे न परवडणारे आहे.
त्यामुळे कामगार दि.१५ मे २०२३ पासून भारत पेट्रोलियम येथील सिलेंडर लोडींग-अनलोडींग चे काम बंद करणार आहे. बंदच्या दरम्यान भारत पेट्रोलियमने कोणतेही बाहेरचे कामगार आणू नये. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्याला भारत पेट्रोलियम जबाबदार राहील. कामबंद आंदोलन कामगार कायद्याच्या नियमानुसार व कामगारांच्या न्याय हक्काकरीता होत असून वेतन दरवाढ हाच मुद्दा आहे. तसेच भारत पेट्रोलियमचे अधिकारी, माथाडी मंडळाचे अधिकारी यांना समक्ष बोलावून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.