मुंबई (वृत्तसंस्था) धार्मिक नेता कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी छत्तीसगडमधील धर्म ससंदेत महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्याचेच पडसाद महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. कालीचरण यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत दिली आहे.
कालीचरण महाराज यांनी संसदेत बोलताना गांधीविषयी अपशब्द वापरले. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गांधींविषयी अपशब्द वापरून महाराजांनी महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे याने हत्या केल्याचे सांगत गोडसेचे कौतूकही केले. सोमवारी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला.
मलिक म्हणाले, कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींना शिवीगाळ केली आहे. ही घटना राज्याबाहेरील असली तरी महाराज अकोल्यातील आहे. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक करावी करावी, अशी मागणी मलिकांनी केली. त्याला भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनीही कडक कारवाईची मागणी केली.
सदस्यांचे बोलून झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला कालीचरण महाराजांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. या घटनेची माहिती घेवून संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असं पवारांनी स्पष्ट केलं. कालीचरण महाराजांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या छत्तीसगड पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री त्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















