मुंबई (वृत्तसंस्था) राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. तर अनेक भागात चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
राज ठाकरेंनी म्हटलं, महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात, पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत रहातील परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला ५०,००० रूपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि द्यावी. आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे.
प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत रहातील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल. परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार तोपर्यंत वाट पहाण्याएवढी ताकद आत्ता शेतकरी बांधव वर्गाकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत, अशी आग्रही मागणी मी ह्या पत्रकानुसार राज्य सरकारकडे करत आहे.