मुंबई (वृत्तसंस्था) बाळासाहेब ठाकरे यांची २४ कॅरेटची शिवसेना राहिलेली नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आरोपांना शिवसेना नेते अनिल परब यांनी जशाच तसं उत्तर दिलंय. सुधीर मुनगंटीवार यांनी सोनाराचा धंदा कधीपासून सुरु केला? असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला. तसेच राजकारणी आहात. राजकारणी राहा. कॅरेटबिरेट मोजत बसू नका, असा टोलाही त्यांनी लगावला.
अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. सुधीर मुनगंटीवारांनी सोनाराचा धंदा कधीपासून सुरू केला? त्यांना म्हणावं आपण राजकारणी आहोत, राजकारण करावं. कॅरेटबिरेट तपासण्याचं काम मुनगंटीवारांचं नाही, असं परब म्हणाले. हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोर कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडावे असं मी नेहमी सांगत होतो. आज या समितीची ५ वाजता बैठक होतंय. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीला एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनाही बोलावलं आहे. यानंतर बैठकीचा अहवाल समिती सीएमला देतील. एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या काय आहेत, त्यांना काय देता येऊ शकतं, याबाबत सातत्याने संबंधित मंत्र्यांशी चर्चा करत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पुन्हा एकदा बोलणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार आहे. हा प्रश्न चर्चेतूनच सुटू शकतो, एसटी कामगारांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन त्यांनी एसटी कामगारांना केलं.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोन वेळा बोललो. त्यांच्यासमोर दोन प्रस्ताव ठेवले आहेत. ते कामगारांशी बोलून पुन्हा येतो म्हणून गेले आहेत. कदाचित कामगारांना समजावण्यात ते कमी पडले असतील किंवा कामगार त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितित नसतील, असा चिमटा काढतानाच चर्चेची दारं खुली आहेत. कुणीही आमच्याकडे चर्चेसाठी यावं, असं आवाहन त्यांनी केलं.