मुंबई (वृत्तसंस्था) अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपल्या ट्विटद्वारे ठाकरे सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये काही प्रश्न विचारत सरकारवर निशाणा साधला आहे. ‘उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?’ असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.
रवी राणा आणि नवनीत राणा यांनी २४ एप्रिल रोजी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेनंतर दोन दिवसांपासून चांगलाच वाद निर्माण झाला होता. तसेच शिवसैनिक आक्रमक झाले होते. रवी राणा यांच्या घराबाहेर आणि मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.
यानंतर पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आंदोलन मागे घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांचा मुंबई दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा रवी राणा यांनी केली. यावर संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली होती. शिवसेनेच्या नादाला लागाल तर २० फूट खाली गाडले जाल असे संजय राऊत म्हणाले होते.
त्यांच्या विधानाचा विरोधकांनी चांगलाच विरोध केला. महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा केली जाते, पण त्याची साधी दखलंही घेतली जात नाही. सरकार सोयीस्करपणे गप्प का आहे, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून केला होता. आता अमृता फडणवीस यांनी ‘उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?’ असे ट्विट करून सरकारला प्रश्न विचारला.