मुंबई (वृत्तसंस्था) विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांना नोटीस बजावली असून त्याला 7 दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
शिवसेना ठाकरे गट प्रतोद सुनिल प्रभू आणि शिवसेना शिंदे गट प्रतोद भरत गोगावले यांनी एकमेकांच्या गटातील आमदारांना व्हिप बजावला होता. त्याचबरोबर आपलाच पक्ष खरा असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर विधिमंडळ सचिवांनी ही नोटीस बजावली आहे. आता दोन्ही गटांना 7 दिवसांमध्ये आपली बाजू मांडावी लागणार आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
या सुनावणीमध्ये आपला विजय होईल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही गटांनी केला आहे. आम्ही काहीही चुकीचं केलं नाही. आम्हीच शिवसेना आहोत हे लवकरच सिद्ध होईल.’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता. तर दुसरीकडे माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. सुनावणीचा निकाल येईल तो शिवसेनेच्या भविष्याचा निकाल नसेल. पण या केसमुळे देशात लोकशाहीचं भविष्य किती काळ मजबूत राहणार आहे. आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का हे सांगणारा हा निकाल असेल. हा निकाल देशाच्या लोकशाहीची वाटचालीची दिशा दाखवणारा निकाल ठरेल,’ असा दावा उद्धव ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता.