मुंबई (वृत्तसंस्था) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांकडून शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Shiv Sena Symbol) गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) याबाबतचा आदेश शुक्रवारी दिला. आता दादरमधील शिवसेना भवन आणि सामना, मार्मिक यांची मालकी कोणाकडे जाणार? असा प्रश्न महराष्ट्राच्या मनात उपस्थित झाला आहे. शिवसेना भवनावर कोणाचा अधिकार राहील?. तसेच मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये असणाऱ्या शाखांचे काय होणार? असे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत.
शिवसेना भवन कोणाचे?
शिवसेनेचे दादरमधील सेना भवन हे भवन शिवाई ट्रस्टच्या मालकीचे आहे. त्यावर पक्षाची मालकी नाही. शिवाई ट्रस्टचे अध्यक्ष लीलाधर डाके असून ते उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. तसेच शिवाई ट्रस्टचे इतर ट्रस्टी देखील उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील आहे. यामुळे पक्ष आणि चिन्ह गेले तरी शिवसेना भवन उद्धव ठाकरे यांच्याच ताब्यात राहणार राहील, हे स्पष्ट आहे.
सामना अन् मार्मिक कुणाचं ?
सामना हे दैनिक आणि मार्मिक शिवसेनेची मुखपत्रे आहेत. सामना आणि मार्मिक यांच्यांवर प्रबोधन प्रकाशन या संस्थेची मालकी आहे. प्रबोधन प्रकाशन ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. ही कंपनी रश्मी उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात आहे. यामुळे सामना आणि मार्मिक उद्धव ठाकरे यांच्यांकडेच राहणार, हे देखील स्पष्टच आहे.
मुंबईतील शाखांचे काय होणार?
मुंबई शहरामध्ये २२७ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेच्या अनेक शाखा आहेत. या शाखांची मालकी ठाकरे गटाकडे आहे. परंतु या बहुतांश शाखा अनधिकृत आहे. त्या स्थानिक शिवसैनिकांकडून चालवल्या जातात. त्या शिंदे गट मिळवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी शुक्रवारी निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागताच आमदार योगेश कदम समर्थकांनी जोरदार घोषणा बाजी करत, उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत दापोली येथील शिवसेना शाखा ताब्यात घेतली आहे. त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले, यामध्ये जोरदार राडा झाला. कदाचित अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी वाद होतील. यामुळे काही शाखा शिंदे यांच्या शिवसेनेला मिळू शकतील.
राज्यातील शिवसेनेची मालमत्ता कोणाची ?
शिवसेना भवनासह मुंबईत, राज्यात पक्षाची कार्यालये आहेत. त्यांची किंमत अनेक कोटींमध्ये आहेत. परंतु मुंबई वगळता इतर कार्यालये कोणाच्या ताब्यात जातील, हे सांगता येत नाही. त्यांची मालकी कोणाची यावर ते अवलंबून राहणार आहे.