दुबई (वृत्तसंस्था) आयपीएल स्पर्धेत आज बलाढ्य मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महत्त्वपूर्ण सामना होत आहे. या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेत पाचवे विजेतेपद साकार करण्यासाठी रोहित शर्मा आणि कंपनी तर, पहिल्याच विजेतेपदासाठी श्रेयस अय्यर सज्ज झाले आहेत.
यंदाच्या स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबईने 14 सामने खेळताना 9 विजयांची नोंद केली. त्यांना 5 सामने गमवावे लागले असले तरीही त्यांनी गुणतालिकेत पहिले स्थान मिळवताना थाटात अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे सुरुवातीचे काही सामने जिंकत गुणतालिकेत अग्रस्थान मिळालेल्या दिल्लीला नंतरचे सामने गमावल्याने प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवणेही कठीण बनले होते. मात्र, त्यांनी सातत्याने सरस कामगिरी करत अखेर अंतिम फेरी गाठली.
रविवारी झालेल्या क्वॉलिफायरच्या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला व या फेरीत प्रवेश करताना विजेतेपदासाठीही दावेदारी सिद्ध केली. अर्थात त्यांना या फेरीत बलाढ्य मुंबईचा सामना करावा लागणार आहे. मुंबईने फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात अफलातून कामगिरी केली आहे. त्यांच्या फलंदाजीला आठव्या क्रमांकापर्यंत खोली आहे. तसेच जसप्रीत बुमराह व ट्रेन्ट बोल्ट यांनी पहिल्या स्पेलमध्येच समोरच्या संघातील बलाढ्य फलंदाजंना तंबूत पाठवले आहे. इतकेच नाही तर त्यांनी डेथ ओव्हर्समध्येही आपली अचूकता सिद्ध करताना सर्व संघांना या पाच षटकांत 8 पेक्षा जास्त सरासरीने धावा करू दिलेल्या नाहीत. त्यातही बोल्टचे स्विंग चेंडू तर बुमराहचे यॉर्कर दिल्लीच्या फलंदाजांसाठी धोका ठरणार आहेत.
इशान किशन, कर्णधार रोहित शर्मा, कॅरन पोलार्ड, कॉन्टन डीकॉक, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या व सौरभ तिवारी अशी भक्कम फलंदाजी त्यांच्याकडे आहे. त्यांच्या गोलंदाजीतही विविधता आहे. बुमराह, बोल्ट यांच्यासह कृणाल पंड्या, नाथन कुल्टरनाईल, राहुल चहर, पोलार्ड यांनीही यंदाच्या स्पर्धेत सातत्याने सरस कामगिरी केली आहे.