चंद्रपूर (वृत्तसंस्था) कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. मात्र महाराष्ट्रातील भाजप पुढाराऱ्यांनी त्यावर अवाक्षर काढलं नाही. मोदींचा अपमान झाल्यावर बोलणारे भाजप नेते आता का शांत आहेत? महाराजांच्या अपमानानंतर शांत बसणाऱ्यांची कबर खोदण्याची वेळ आलीय, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
राज्यात नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार धुमधडाक्यात सुरु आहे. चंद्रपुरातील गोंडपिपरी येथे गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील बड्या नेत्यांच्या सभा होत आहे. मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभा घेतल्यानंतर आज अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ गोंडपिपरीत सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. “कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावर तेथील मुख्यमंत्र्यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना ही छोटी घटना असल्याचं म्हटलं. या सगळ्या प्रकरणानंतर प्रत्येक शिवप्रेमी भडकून उठला. मात्र महाराष्ट्रातील भाजप पुढाराऱ्यांनी त्यावर अवाक्षर काढलं नाही. मोदींचा अपमान झाल्यावर बोलणारे भाजप नेते आता का शांत आहेत? महाराजांच्या अपमानानंतर शांत बसणाऱ्यांची कबर खोदण्याची वेळ आलीय”, असं अमोल मिटकरी म्हणाले.