भुसावळ (प्रतिनिधी) फैजपूर येथील संतपंथ मंदिराचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन महाराज हे लोकसभेसाठी तयारी करत असल्याची कुजबूज सुरू होती. पण, खडका (ता. भुसावळ) येथे सोमवारी झालेल्या भागवत सप्ताहात महाराजांनी आपण केवळ धर्म जागरणाचे काम करणार. राजकारणात कदापि जाणार नाही असे सांगत राजकारणात प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
खडका येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी आशीर्वचन दिले. महाराज म्हणाले की, राजसत्ता जर धर्मसत्तेचा आदर करून काम करेल तर ती निश्चितच विश्वविख्यात होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवून दिले. त्यांनी देखील संत परंपरेचा व त्यांच्या मार्गदर्शनाचा आदर केला. श्रीराम जन्मभूमी भूमिपूजन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील धर्म सत्तेसमोर नतमस्तक होऊन जगाला धर्मसत्तेचे महत्त्व दाखवून दिले. राज सत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी आहे. त्यामुळे भविष्यातही आपण धर्मासाठी, धर्म जागरणासाठी काम करू. राजकारणात कदापि जाणार नाही, असे स्पष्ट केले.