जळगाव (प्रतिनिधी) शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे गटात शिवसेनेचे जवळपास 40 आमदारांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडी कोणत्याही क्षणी कोसळू शकते. दरम्यान शिंदे यांच्या बंडखोरी मागे नक्की कुणाचा हात आहे? या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठे विधान करत फक्त जय ‘श्री राम’ अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसे यांनी नुकताच जळगावात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात काही आमदार थेट पक्ष सोडून जात आहेत. त्यांच्यामुळे सध्या राज्यात जे राजकारण चालले आहे तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे.शिंदे यांच्या पाठीमागे कुणी तरी मोठी शक्ती आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे बंड करण्यापर्यंत धाडस करणार नाही,” असे खडसे यांनी म्हंटले आहे.
शिंदे व आमदारांना कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय शिंदे इतके धाडस करणार नाही. भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईलच. गेल्या ४० वर्षात असे राजकारण मी अनुभवले नव्हते राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे.कोण कुणाबरोबर आहे यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केलंय. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत आहेत. अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत.