पाटणा (वृत्तसंस्था) काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांच्या सभेत लालूप्रसाद यादव यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा नितीश कुमारांना अशाच एका प्रसंगाला सामोरे जावे लागले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली असून त्यासाठी नितीश कुमार हरलाखी येथे आले होते. यावेळी भाषणादरम्यान त्यांच्यावर कांदे फेकून मारण्यात आले आहे.
बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना गेल्या काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. नितीश कुमार यांचे भाषण सुरु असताना हा प्रकार घडला. यावेळी नितीश बिहारमध्ये आपल्या सरकारने किती रोजगार दिले, याविषयी बोलत होते. बिहार आणि झारखंड एकत्र असताना तेव्हाच्या सरकारने केवळ ९५ हजार नोकऱ्या दिल्या. मात्र, आमच्या सरकारच्या कार्यकाळात जवळपास सहा लाख जणांना नोकऱ्या देण्यात आल्याचा दावा नितीश कुमार यांनी केला. त्यावेळी समोरील जनसमुदायातील काही लोकांनी व्यासपीठावर कांदे भिरकावले. काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांच्यासोबत परसा विधानसभा मतदारसंघात असाच एक प्रसंग घडला होता.