जळगाव (प्रतिनिधी) जळगाव व धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांना वरदान ठरणारा तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प, पाडळसे हा लवकरच पूर्ण होऊन याठिकाणी येत्या अडीच-तीन वर्षात पाणीसाठा होण्यास सुरुवात होईल. असा विश्वास राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
मंत्री पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील मौजे पाडळसे गावाजवळील तापी नदीवर निम्न तापी प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार अनिल पाटील, आमदार लताताई सोनवणे, माजीमंत्री एकनाथराव खडसे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, साहेबराव पाटील, प्रा. शरद पाटील, मनीष जैन, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बी. एस. स्वामी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य अभियंता एम. एस. आमले, रुपालीताई चाकणकर, पुष्पलताताई पाटील, जयश्रीताई पाटील, नाशिक येथील मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेचे मुख्य अभियंता मंदाळे, अधिक्षक अभियंता पी. आर. मोरे, राजेश मोरे, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, कार्यकारी अभियंता श्रीमती रजनी देशमुख, हेमंत खोरगडे आदि उपस्थित होते.
ना. पाटील पुढे म्हणाले की, धरणाच्या डिझाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे, त्यानंतर पुढील दोन टप्प्यात धरणाच्या कॉक्रीटीकरणाचे काम पूर्ण होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तापी नदीचे गुजरात राज्यात वाहून जाणारे महाराष्ट्राचे वाट्याचे पाणीही मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आमदार अनिल पाटील यांनी या प्रकल्पाच्या क्षेत्रातील तालुके हे अवर्षणप्रवण तालुके आहेत. या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी या प्रकल्पास चालू अर्थसंकल्पात किमान २५० कोटी रुपयांची तरतूद करण्याची व या प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत करण्याची विनंती जलसंपदामंत्र्यांना केली. माजीमंत्री खडसे म्हणाले की, या प्रकल्पामुळे सहा तालुक्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार असून शेतीसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार असल्याने हा प्रकल्प लवकर पूर्ण करावा. त्याचबरोबर जिल्ह्यातील वरखेड लोंढे धरण क्षेत्रास शासनाने वाळूक्षेत्र घोषित केले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा होणार असल्याने या वाळू विक्रीतून मिळणारा निधी हा जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण करण्यास वापरण्याची सुचनाही यावेळी केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जलसंपदामंत्र्यांनी या प्रकल्पाच्यास्थळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची स्थिती, तांत्रिक मुद्दे, प्रकल्पातील अडचणी आदिंबाबत माहिती करुन घेतली व सकारात्मक चर्चा केली. या प्रकल्पाविषयीची सविस्तर माहिती कार्यकारी संचालक स्वामी यांनी दिली. तर प्रकल्पाचे सादरीकरणात या प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, पारोळा, चोपडा व धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व धुळे तालुक्यातील २५६५७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून प्रकल्पाचे ७० टक्के मातीकाम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर ५४३.६७ कोटी रुपये खर्च झाला असून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २२०७.४३ कोटी रुपयांची आवश्यक असल्याची माहिती कार्यकारी अभियंता श्रीमती रजनी देशमुख यांनी दिली. त्यानंतर पाटील यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन झालेल्या कामाची पाहणी केली. यावेळी पाडळसे धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी यांनीही प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती जलसंपदामंत्र्यांना निवेदनाद्वारे केली. कार्यक्रमास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह परिसरातील गावातील शेतकरी, नागरीक, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.