धुळे (प्रतिनिधी) भाजपच्या मुंगेरीलालचे हसीन सपने, बाबा आदम आयेंगे और खैरात बाटेंगे…आकाशातून यांच्या बारा पिढ्या खाली उतरल्या तरी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे बाल वाकडे होणार नाही. असा उल्लेख परिपत्रकात करून माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवर निशाणा साधलाय.
दोन दिवसांपूर्वी धुळ्यामध्ये भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत भाजपची जन आशीर्वाद यात्रा झाली. यावर गोटे यांनी परिपत्रकातून चांगलाच निशाणा साधला आहे. धुळे शहरातील रस्त्यांची विदारक अवस्था महापालिकेतील बेधुंद भ्रष्टाचार, हजार रुपयाच्या स्वयंपाकाचा गॅस पंधराशे रुपयाला करा, डिझेल, पेट्रोलचे गगनाला भिडणारे भाव सत्तर रुपयाची खाद्यतेल गरिबांनी खाताच कामा नये! सीमेवर लढणाऱ्या जवानांची बलिदान असेच सुरू राहावे, गरिबांना जगणे मुश्किल व्हावे, देशात आपण जिवंत आहोत, यालाच विकास समजा यासाठी जन आशीर्वाद यात्रा..असे म्हणत गोटे यांनी भाजपच्या नेत्यांतर्फे महाविकास आघाडी सरकार पडणार या वेळोवेळी केल्या जाणाऱ्या विधानाचा देखील समाचार परिपत्रकाद्वारे घेतला आहे.