मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याची माहिती माहिती मिळत आहे. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सध्या नॉट रिचेबल असून त्यानंतर त्यांनी पहिली फेसबुक पोस्ट लिहिली आहे. योग म्हणजेच संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृध्द जीवनाचा राजमार्ग…असे त्यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार सुरतला असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सोमवारी रात्री उशिरा ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आमदार उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची अनुपस्थिती हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.
भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. राज्यसभेला भाजपा १२३ मतं मिळाली होती. मात्र विधान परिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलं आहे. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे. निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याचं दिसतं आहे. शिंदे यांचा कालपासून फोन नॉट रिचेबल आहे. ते गुजरातमध्ये आहे. आज दुपारी १ वाजेनंतर शिंदे हे पत्रकार परिषद घेणार असंही बोललं जातं आहे.
















