मुंबई (वृत्तसंस्था) मशिदींवरील भोंग्यांवरुन वातावरण तापलेलं असतानाच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (akbaruddin owaisi) हे गुरुवारी औरंगाबादेत आले आणि त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर थेट ओवैसींना इशाराच दिला आहे. तुम्हालाही त्याच कबरीत गाडणार असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.
औरंगजेबाच्या कबरीपुढे माथा टेकणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. ते म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही, वारंवार औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकवत महाराष्ट्रात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न ओवेसींकडून होतोय. औरंगजेबाने आमची मंदिरं उध्वस्त केली, औरंगजेबाला ही महाराष्ट्राच्या याच मातीत गाडलं होतं, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल हे लक्षात ठेवा. ज्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं, त्यांनाही याच मातीत गाडू, त्यामुळे महाराष्ट्राला आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात येत असेल तर आम्ही ते आव्हान स्वीकारायला तयार आहे असं संजय राऊत म्हणाले.
काश्मिरी पंडितांची घरवापसी हा भारतीय जनता पक्षाचा मुख्य अजेंडा होता, काश्मिरी पंडितांच्या सोयी-सुविधा, त्यांच्या सुरक्षेसाठी 370 कलम हटविण्यात आले. याला शिवसेनेचा पाठिंबा राहिलेला आहे. तरीही या पंडितांची घरवापसी होऊ शकली नाही, त्यांच्यासोबत सामान्य रहिवाशीही आजही असुरक्षितच आहे, त्यामुळे हनुमान चालिसा, लाऊडस्पीकर असे विषय मुद्दाम बाहेर काढून जनतेचं मन जिंकता येत नाही.