धरणगाव (प्रतिनिधी) बहुजन क्रांती मोर्चाच्या मार्फत ग्राऊंड लेव्हलवर काम करणाऱ्या तब्बल ३०० कोरोना योध्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
१० ऑगस्ट २०२० रोजी ‘कोरोना योध्यांच्या हस्ते गुणवंतांचा गुणगौरव’ हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या कार्यक्रम प्रसंगी घोषणा करण्यात आली होती की बहुजन क्रांती मोर्चा मार्फत ग्राऊंड लेव्हलवर काम करणाऱ्या कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात येईल. लॉकडाऊनचे नियम लक्षात घेऊन प्रत्येक कार्यालयात आणि घरी जाऊन सर्व कोरोना योध्यांना सन्मानित करून वचनपूर्ती करण्यात आली.कोरोना या जागतिक महामारीच्या काळात माणसाला माणसाची भीती वाटत होती. या कालावधीत आप्तेष्ट – नातेवाईक , मित्र परिवार सर्वच दुरावले गेले. अशा परिस्थितीत ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या कामाला प्रथम प्राधान्य देत लोकसेवा केली अशा लोकांचा सन्मान होणं अगदी क्रमप्राप्त होतं. सर्वप्रथम नगरपालिकेतील सफाई विभाग , पाणीपुरवठा विभाग , कोविड सेंटरला काम करणारे व न.पा. कर्मचारी इ. ना नगरपालिका सभागृहात लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. मुख्याधिकारी जनार्दन पवार यांचा देखील कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स , नर्सेस , वार्डबॉय , मेडीकल स्टाफ , लॅब कर्मचारी , ऍमबुलन्स ड्रायव्हर , सफाई कर्मचारी या सर्वांना वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीष चौधरी , डॉ. बारेला , डॉ. कुमट यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस बांधवांना देखील पोलीस निरीक्षक पवन देसले साहेब यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.
तहसिल कार्यालयातील कर्मचारी विशेषतः सर्व कोतवाल यांनी कोरोना काळात कोविड सेंटर येथे ड्युटी केली त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी तहसिलदार नितीनकुमार देवरे व आदर्श नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. कोरोना काळात ज्या शिक्षक बांधवांनी गावातील आणि तालुक्यातील विविध चेक पोस्टवर ड्युटी केली, त्यांचा देखील घरी जाऊन सन्मान करण्यात आला. १० तारखेच्या कार्यक्रमाला जे मान्यवर व्यक्ती आणि दहावीतील गुणवंत विद्यार्थी येऊ शकले नव्हते त्यांचा देखील घरी जाऊन सन्मान करण्यात आला.
बहु म्हणजे जास्त आणि जन म्हणजे लोकं, हे वाक्य सार्थ ठरवत बहुजन क्रांती मोर्चा धरणगावच्या वतीने कोविड सेंटर , नगरपालिका , ग्रामीण रुग्णालय , पोलीस स्टेशन , तहसिल , शिक्षण विभाग , पोस्ट खाते , महावितरण या सर्व विभागातील जवळजवळ ‘३०० कोरोना योध्यांना’ सन्मानपत्र देऊन एक उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोरोना योध्यांच्या बद्दल ऋण व्यक्त करण्यात आले.
सन्मानपत्र वितरीत करतांना बहुजन क्रांती मोर्चाचे तालूका संयोजक राजेंद्र ( आबा ) वाघ , बामसेफचे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील, तालूका उपाध्यक्ष हेमंत माळी , छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , बामसेफचे महासचिव आकाश बिवाल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत मुक्ती मोर्चाचे महासचिव मोहन शिंदे व धरणगाव तालुकाध्यक्ष गौतम गजरे , बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे निलेश पवार , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे सिराज कुरेशी , प्रोटॉनचे सुनिल देशमुख , किशोर पवार , व्ही. टी. माळी , कैलास पवार सर , बाळू चौधरी , सूरज वाघरे , नगर मोमीन , विनोद बिजबीरे , विकास पवार, रईस मोमीन आदींनी परिश्रम घेतले.