पारोळा (प्रतिनिधी) बोरी नदी पात्रात होणारी वाळू चोरी रोखण्यासाठी महसूलचे पथक करमाड बुद्रुक येथील बोरी पात्रात गेले होते. त्यावेळी तस्करांनी पथकातील सदस्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालत चिरडून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला. या प्रकरणी पारोळा पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नदीपात्रात चार विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर आले. त्यावेळी पथकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाळू तस्करांनी पथकाला दमदाटी केली. त्यातील एक ट्रॅक्टर जागेवर थांबले व त्यावरील चालक पळून गेला. दुसरे लाल रंगाचे स्वराज कंपनीचे विना नंबरचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह न थांबता, चालकाने पथकातील सदस्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. नंतर हा चालक वाहन घेऊन पसार झाला.
नंतर मागून दोन येणारे ट्रॅक्टर पथकाने थांबवले. त्यावरील चालक ट्रॅक्टर सोडून पळुन गेले. त्यानंतर बलेल्या ट्रॅक्टरजवळ संशयित राकेश मधुकर पाटील (रा. करमाड बुद्रुक) व आनंदा देशमुख (रा.कुंझर, ता. चाळीसगाव) व चार अनोळखी हे हातात काठ्या व दगड घेऊन आले. तसेच सर्वांनी पथकाला दमदाटी व शिविगाळ केली. संबंधितांना पथकाने ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात नेण्याची सूचना केली. मात्र, संशयितांनी वाळू रस्त्यावर उपसून वाहनासह पळ काढला. याप्रकरणी राकेश पाटील व आनंदा देशमुख यांच्यासह इतर अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल झाला.