जळगाव (प्रतिनिधी) संपुर्ण राज्यात अति पावसाने पूरस्थिती तसेच शेतीची परिस्थिती गंभीर होत चालली असतांना त्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे दिल्ली वारी करण्यात व्यस्त आहेत. तर राज्यातील जनता ही वाऱ्यावर असल्याचे चित्र प्रथम पहावयास मिळत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथराव खडसे यांनी केली आहे.
एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, संपुर्ण राज्यात अतिवृष्टीसह शेतीची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे दिल्ली वारी करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे राज्यातील जनता ही वाऱ्यावर असल्याचे चित्र प्रथम पहावयास मिळत आहे. राज्यात २५ दिवस झालेत तरी राज्यात मंत्रीमंडळ झालेले नाही. या ठिकाणी जर मंत्रिमंडळ असते तर लोकांचे समस्या सुटण्यास मदत झाली असती. शासनाकडून नुकसान जनतेला काही मदत करता आली असती. तसे न होणे हे आपल्या राज्याचे दुदैव आहे. लोकप्रतिनिधी ही राज्याची परिस्थिती प्रभावीपणे मांडु शकतो. पण राज्यात मंत्रीमंडळच नसल्याने प्रशासनाची जबाबदारी ही शासकीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेली असून अधिकारी हे आपले काम त्यांच्या चाकोरीत राहून करताय, असे मत खडसे यांनी यावल येथे व्यक्त केले.