जळगाव (प्रतिनिधी) बी.एड, एम.एड अभ्यासक्रमाची सीईटी २१ ते २३ ऑक्टोंबरच्या दरम्यान होणार आहेत. अंतिम वर्षाच्या विद्यापीठ परीक्षा देखील याच काळात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अंतिम वर्षाच्या विद्यापीठ परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी राष्ट्रवादीचे अँड.कुणाल पवार यांनी कुलगुरू पी पी.पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
अॅड. कुणाल पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे बरेच विद्यार्थी बी.एड,एम.एड अभ्यासक्रमाची सीईटी देतात. तेव्हाच त्यांचावरील अभ्यासक्रमाचा प्रवेश महाराष्ट्र शासन मान्यता देते. तथापी सदरची सीईटी २१ ते २३ ऑक्टोंबरच्या दरम्यान असल्यामुळे बरेच विद्यार्थी या परिक्षेपासून वंचित राहतील. त्यामुळे वरील दिवशी असलेल्या विद्यापीठ परीक्षा तात्काळ पुढे ढकलाव्यात किंवा त्यांना परीक्षा देण्यासाठी पुढील मुदत मिळावी. म्हणजे संबधित विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही किंवा कोरोना महामारीमध्ये शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे म्हटले आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी कॉंग्रेस महानगर सचिव अॅड. कुणाल पवार, जिल्हाउपाध्यक्ष भूषण भदाणे यांची स्वाक्षरी आहे.