शिमला (वृत्तसंस्था) जगातील सर्वात मोठा अटल बोगद्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. साधारण ९ किमी लांबी आणि १०,००० फुटांहून अधिक उंचीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे. यावेळी उद्घाटनाला सीडीएस जनरल बीपीन रावत आणि लष्करप्रमुख एमएम नरवणे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित होते.
हिमालयाच्या डोंगरदऱ्यांना भेदून बनविण्यात आलेला हा बोगदा समुद्रसपाटीपासून ३०६० मीटर उंच आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते. यामुळे येथील मोठ्या प्रदेशाचा संपर्क तुटतो. या टनेलमुळे आता १२ ही महिने हा प्रदेश संपर्कात राहणार आहे. हा टनेल बांधण्य़ाचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी २००० मध्ये घेतला होता. मनाली आणि लेहचे अंतरही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. डोंगररांगांचा, घाटाचा ४६ किमीचा रस्ता कमी झाला आहे. या बोगद्याला बनविण्यासाठी १० वर्षे लागली.