श्रीनगर (वृत्तसंस्था) काश्मीरचे लोक स्वत:ला भारतीय मानत नाहीत. काश्मीर स्वत:ला भारतीय मानत नाही आणि त्याला भारतीय व्हायचे देखील नाही. त्या ऐवजी चीनने काश्मीरवर शासन करावे असे काश्मिरी लोकांना वाटत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केले आहे.
अब्दुल्ला पुढे म्हणाले की, प्रामाणिकपणे सांगायचे म्हटल्यास आश्चर्य वाटेल की आपण भारतीय आहोत असे सांगणार कोणीही सरकारला काश्मीरमध्ये आढळणार नाही. तु्म्ही या आणि तेथील कोणाशीही बोला, ते स्वत:ला भारतीय देखील मानत नाहीत आणि पाकिस्तानी देखील मानत नाहीत, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. गेल्या ५ ऑगस्टला त्यांनी (मोदी सरकार) जे केले, तो शवपेटीतील शेवटचा खिळा होता, असेही अब्दुल्ला म्हणाले. काश्मिरी लोकांचा सरकारवर जराही विश्वास राहिलेला नाही. फाळणीच्या वेळी खोऱ्यातील लोकांना पाकिस्तानात जाणे सोपे होते, मात्र तेव्हा त्यांनी गांधींचा भारत निवडला, मोदींचा भारत निवडलेला नव्हता, असे फारूख अब्दुल्ला म्हणाले.