नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनस्थित एक डिजिटल तंत्रज्ञान कंपनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे दहा हजार अतिमहत्त्वाच्या भारतीयांच्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याची खळबळजनक माहिती ‘दि इंडियन एक्स्प्रेस’च्या हाती आली आहे.
याबाबत लोकसत्ताने दिलेल्या वृतात चीन सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित ‘झेनुआ डाटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड’ ही कंपनी केवळ महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांवरच नजर ठेवून नाही, तर अनेक राजकीय संस्था आणि उद्योगांवरही ती हेरगिरी करीत आहे. राजकीय व्यक्तींव्यतिरिक्त संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह १५ माजी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाई दलप्रमुख, सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, लोकपाल पी. सी. घोष, भारताचे महालेखा परीक्षक (कॅग) जी. सी. मुर्मू यांच्या हालचालींची नोंदही ‘झेनुआ’ कंपनी ठेवत असल्याची माहिती हाती आली आहे. त्याचबरोबर उद्योगपती रतन टाटा आणि गौतम अदानी यांच्यासह ‘भारत पे’ या ‘अॅप’चे संस्थापक निपुण मेहरा आणि ‘अर्थब्रिज’चे अजय त्रेहान आदी नवउद्यमींवरही ही चिनी कंपनी हेरगिरी करीत असल्याचे आढळले आहे. एवढेच नव्हे तर, ‘झेनुआ’ कंपनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबीय. विविध राज्यांचे मुख्यमंत्री पंजाब-अमरिंदर सिंग, ओदिशा- नवीन पटनायक, पश्चिम बंगाल- ममता बॅनर्जी, राजस्थान- अशोक गेहलोत, मध्य प्रदेश -शिवराज सिंह चौहान. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, पीयूष गोयल. चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, हिंदू समूहाचे अध्यक्ष एन. रवी, झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी, इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई, पंतप्रधान कार्यालयातील माजी माध्यम सल्लागार संजय बारू, दि इंडियन एक्स्प्रेसचे मुख्य संपादक राज कमल झा या महत्त्वाच्या पदांवरील अधिकारीवर्ग, न्यायमूर्ती, शास्त्रज्ञ, अभ्यासक, संशोधक, पत्रकार, कलाकार, खेळाडू, आध्यात्मिक गुरू आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरही पाळत ठेवून आहे. तसेच आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि अमली पदार्थ, सोने किंवा वन्य प्राण्यांच्या तस्करीतील गुन्हेगारांवरही ‘झेनुआ’ची नजर ठेवून आहे. ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ ‘झेनुआ’ कंपनीच्या माहिती साठय़ातून भारतीयांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.