जळगाव (प्रतिनिधी) शहरातील खराब रस्त्यांमुळे संतप्त झालेले सामाजिक कार्यकर्ते पराग कोचुरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. या पत्रात जळगावकरांना रस्ते कर माफ करून त्यांच्या आरोग्य व वाहन दुरुस्तीसाठीचा खर्च शासनाने द्यावा, अशी मागणी केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते पराग कोचुरे यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे पाठवलेले पत्र त्यांनी सोशल मीडियात शेअर केले आहे.
माननीय मुख्यमंत्री साहेब,
महाराष्ट्र राज्य, भारत.
सस्नेह नमस्कार,
मी, पराग घनश्याम कोचुरे, रा. जळगाव, जिल्हा/तालुका जळगाव, एक सामान्य नागरिक म्हणून आपल्यास हे पत्र पाठवत असून आपल्याकडून सकारात्मक कारवाईची अपेक्षा करत आहे.
तर पार्श्वभूमी अशी आहे की, जळगाव येथील रस्ते ( तसा एकही मार्ग रस्ता म्हणायच्या लायकीचा नसून मला हा शब्द वापरावा लागतो आहे) गेल्या कित्येक वर्षापासुन अतिशय दुरावस्थेत आहेत. तरी, गेल्या 2 निवडणुकांपासून, म्हणजेच 2014 व 2019, आम्हास भाजप व्यक्तींकडून रस्ते दुरुस्त करू अथवा रस्ते कर माफ करू हे आश्वासन देण्यात येत आहे. त्यावर जळगाव येथे येऊन आमचे पर्सनल संकट मोचन गिरीश महाजन व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी स्वतः येऊन ह्या वचनाची पुष्टी छातीठोकपणे केली होती. ह्याच आशेवर आम्ही त्यांना 2 वेळेस निवडूनही दिले आहे. येथील सुरेश दामू भोळे आमदार, उन्मेष पाटील खासदारच नव्हे तर महानगरपालिकेच्या सत्तेवर सुद्धा भाजप निवडून आम्ही प्रगतीच्या अपेक्षा ठेवुन आहोत.
आम्ही नागरिक ह्या अपेक्षा ठेवुन व त्याचा सतत अपेक्षाभंग होत असल्या कारणाने मला आज आपल्याला हे पत्र लिहावे लागत आहे. आमच्याकडे रस्त्यांमुळे गाड्याच नाही तर आमचे स्वास्थ्य सुद्धा खराब होत आहे. मान, मणके, कंबर ह्याचे तर त्रास आहेतच पण गाड्याही दर 5 दिवसाला काम काढत आहेत. आपल्यास जळगाव येथे येऊन माझ्या घरी 4 दिवस राहण्याची नम्र विनंती करतो. ह्या कालावधीत मी दुसरे काहीही काम न करता आपल्यास माझ्या दुचाकीवरून सकाळी व सायंकाळी 1 तास जळगाव फिरवू अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे जो आपल्या कंबरेला, मानेला, मानण्याला व इतरही जे त्रास त्या 4 दिवसात होतील त्याचे उपचार स्वखर्चाने करण्यास तयार आहे.
दुचाकीवर फिरल्याने आपल्याला आमच्याकडील रस्त्यानी अंग दुखी होईल त्यासाठी मी एक मालीश करणारा सुद्धा बघून ठेवला आहे. तरी माझी अशी ईच्छा आहे की आम्ही जळगावकर जे रोज अनुभवतो ते आपण 4 दिवस अनुभवून मग येथील परिस्थितीवर आपल अमूल्य मत प्रकट करावे. येण्याची वेळ खालील मोबाईल नंबरवर कळवावे. हे जर शक्य नसेल तर कृपया आमच्या येथील रस्ते नूतनीकरणासाठी काही मार्ग काढावा कारण साध्या जे आमची महानगरपालिका मुरुम व कच टाकून रस्त्यांची लाली पोती करत आहेत ते निव्वळ पैसे खायचे व घाणेरड्या नियोजनाचा परिणाम आहे.
जर तसेही शक्य नसेल तर जळगाव येथील रहिवाशांचे रस्ते कर तर माफ करण्यातच यावे अधिक त्यांच्या गाड्या सुधारण्याची व आरोग्याच्या खर्चाची सुद्धा शासनाने सोय करावी. आपल्या वर मला पूर्ण विश्वास असून आपण योग्य तेच पाउल उचलाल ह्याचीही खात्री आहे. आपल्या राज्यात राहणारा एक सामान्य नागरिक…!
पराग घनश्याम कोचुरे