जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गटाने ऐतिहासिक यश मिळविल्यानंतर आता दूध संघाच्या चेअरमनपदी कोण विराजमान होणार?, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत ‘जायंट किलर’ ठरलेले आमदार मंगेश चव्हाणांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दूध संघाच्या चेअरमनपदाची निवड १८ रोजी होणार आहे. दूध संघात भाजप- शिंदे गटाला स्पष्ट बहुमत असल्याने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील हे तीन नेते अंतिम निर्णय घेणार असून, त्यासाठी १७ रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे. परंतू आ. मंगेश चव्हाणांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांनी आधीच चेअरमनपदासाठी आपण इच्छुक नसल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे आ. मंगेश चव्हाण यांनी आक्रमकतेने निवडणूक लढली. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना थेट त्यांच्याच मतदार संघात आव्हान देत निवडणूक जिंकून देखील दाखवली. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच पालिका निवडणुकीपर्यंत दुध संघाचा विजयी जोश टिकवून ठेवत फायदा उचलण्याचा भाजप-शिंदे गट प्रयत्न करू शकतो.
चेअरमनपदासाठी खडसेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांचा पराभव करणाऱ्या मंगेश चव्हाणांचे नाव आघाडीवर आहे. कारण दुध संघातील भ्रष्टाचार, अनियमितेवर हल्लाबोल करून दुध संघ काबीज करणाऱ्या भाजप-शिंदे गटाला भविष्यात याबाबत कायदेशीर लढाई लढायची आहे. दुध संघातील गैरव्यवहाराबाबत आमदार मंगेश चव्हाण यांचा सखोल अभ्यास आहे. त्यामुळे भविष्यातील कायदेशीर गोष्टी आमदार चव्हाण हे चांगल्याप्रकारे हाताळतील, असा सर्वांना विश्वास आहे. त्यामुळे मंगेश चव्हाणांच्या नावावर सर्वांचे एकमत असल्याचे बोलले जात आहे. प्रशासक पदाच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्याच्या समोर आणला. तसेच दुध संघातील तूप, बटर अपहार बाबत फिर्याद दाखल करण्यापासून सर्व गोष्टींवर मंगेश चव्हाण यांनी जोमाने बाजू लावून धरत अक्षरशः रान पेटविले होते.
आमदार संजय सावकारे आणि संजय पवार हे देखील चेअरमनपदासाठी इच्छुक आहेत. परंतू आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता. मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील हे आमदार मंगेश चव्हाण यांच्या रूपाने हुकुमी एक्का पुन्हा मैदानात उतरवू शकतात. दुध संघाची निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघातून लढल्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने गाजली. अगदी आ, चव्हाण आणि खडसे यांच्यात चांगलेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यामुळेच या निवडणुकीला वलय प्राप्त झाले होते. त्यामुळे चेअरमनपदाची माळ आमदार मंगेश चव्हाण यांच्या गळ्यात टाकून सर्व नेते एकप्रकारे आ. चव्हाण यांच्या लढ्याला सन्मान देतील, अशी चर्चा आहे.
















