मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतू आता केसरकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गट अडचणीत येत असल्याने लवकरच किरण पावसकर यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सध्या केसरकर सडकून टीका करत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर केसरकर यांची शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली. शिंदे गट गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांची भक्कम बाजू केसरकर यांनी मांडली होती. परंतू आता केसरकर हे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत. यामुळे राणे आणि केसरकर यांच्यात वाद पेटला होता. यावर भाजप आणि शिंदे गटात दुरी निर्माण होईल, अशी विधानं करू नयेत, अशी ताकीद मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. अशातच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांच्याविरोधात मोठा निर्णय घेतला आहे.
दीड महिन्यातच दीपक केसरकरांकडून प्रवक्तेपदाची जबाबदारी काढून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. गेल्या ३ आठवड्यांपासून अनेक पत्रकार परिषदांमधून केसरकरांनी भाजप-शिंदे गटात कटुता निर्माण होईल, अशी विधाने केल्याने भाजपचे काही आमदार नाराज आहेत. त्यांनी केसरकरांची तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही भाजप आमदारांनी केसरकरांविरोधात तक्रारीचा पाढा वाचला आहे. त्याचमुळे केसरकरांची मुख्य प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
















