धरणगाव (प्रतिनिधी) भर पावसाळ्यातही पाणी टंचाईमुळे संतप्त झालेल्या लोहार गल्लीतील महिलांनी आज नगरपालिकेवर धडक दिली. एवढेच नव्हे तर, धरणगाव पालिकेला बांगड्यांचा आहेर देत महिलांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी महिलांनी नगराध्यक्ष निलेश चौधरी आणि पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. दरम्यान, भर पावसाळ्यात पाणी टंचाई असूनही पालिका प्रशासन गेंड्याची कातडी ओढून झोपेचे सोंग घेत असल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात येत होता.
पाणी टंचाईमुळे संतप्त झालेल्या लोहार गल्ली परिसरातील महिलांनी माजी नगरसेविका नर्मदाबाई एकनाथ माळी यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर मोर्चा काढला. पालिकेत पोहोचल्यावर संतप्त महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या दालनात तब्बल एक तास ठिय्या मांडून होते. जोपर्यंत नगराध्यक्ष समोर येत आमच्या समस्या जाणून घेत नाही, तोपर्यंत आम्ही दालनातून निघणार नाही अशी भूमिका महिलांनी घेतल्यामुळे अखेर नगराध्यक्षांना महिलांच्या समोर यावेच लागले. तत्पूर्वी सर्व संतप्त महिलांनी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या दालनात व न.पा. च्या आवारात हातातील बांगड्या बांगड्या फोडून आपला संताप व्यक्त केला.
धरणगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदी व अंजनी नदी भरभरून वाहत असून सुध्दा मागील २३ दिवसापासून लोहार गल्ली परिसरातील पाणीपुरवठा खंडित होता. दरम्यान, आज पाणी आले. परंतू अवघा तास पाणी सुरु राहिले. त्यामुळे महिलांचा संताप अनावर झाला. त्यांनी थेट पालिकेवर धडक दिली. यावेळी महिलांनी पालिका कार्यालयात सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एवढेच नव्हे तर, पाणी पुरवठा अधिकारी अनुराधा चव्हाण यांच्या दालनात जाऊन जाब विचारला. संतप्त महिलांनी सुमारे २ तास पालिका सभागृहात सत्ताधारी तसेच न. पा. प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत घाम फोडला.
विशेष म्हणजे महिनाभरात धरणगाव नगरपालिकेवर पाणीप्रश्नी नागरिकांनी दुसऱ्यांदा मोर्चा काढलाय. तरी देखील गेंड्याची कातडी ओढून पालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. यावेळी किरण वऱ्हाडे, टोनी महाजन, विकास चौहान, हरीश माळी, दयाराम माळी, गोपाळ लोहार, हर्षल माळी यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. दरम्यान, यावेळी नगराध्यक्षांनी काही जबाबदारी वार्डच्या नगरसेवकाची पण असते म्हणून महिलांची समजूत घालून अंग झटकण्याचा प्रयत्न केला.