नागपूर (वृत्तसंस्था) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी सभागृहात दिशा सालियान मृत्यूप्रकरणाची खोटी माहिती दिली असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. अगदी फडणवीस यांच्यावर सोमवारी हक्कभंग आणणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सालियानच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली आणि त्याचा सविस्तर अहवाल देखील सादर केला आहे. तरीसुद्धा फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना चुकीची माहिती दिली. पदाचा दुरुपयोग करुन त्यांच्याकडून जाणूनबुजून खोटी माहिती देण्यात आली. राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आम्ही सोमवारी सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव देणार आहोत, असं नाना पटोले म्हणाले.
नागपूर न्यास भूखंड प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधकांनी लक्ष्य केले आहे. पण जे उपमुख्यमंत्री फडणवीस आज शिंदेंची बाजू घेत आहेत खरंतर त्यांनीच याप्रकरणी याचिका दाखल केली होती, असेही नाना पटोले म्हणाले. फडणवीसांना हे प्रकरण पूर्ण माहिती आहे. यात भ्रष्टाचार झाला आहे याची त्यांनाही माहिती आहे कारण त्यांनीच याप्रकरणी याचिका केली होती. पण आज ते मुख्यमंत्र्यांची बाजू घेत आहेत, असेदेखील नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.