मुंबई (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. फडणवीसांसोबत झालेली बैठक गुप्त नव्हती. आमच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी झालेल्या भेटीबद्दल खुलासा केला. मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच. विरोधीपक्ष नेते आणि बिहार भाजप प्रभारी आहेत. फडणवीस आणि मी काही शत्रू नाही, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे. तसेच. आमच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती, असेही ते म्हणाले. ही बैठक गुप्त नव्हती. ‘सामना’साठी देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत घेण्याचा आमचा विचार आहे. त्याविषयीच आम्ही काल चर्चा केली. परंतु, आपली जाहीर मुलाखत घेण्यात यावी, अशी इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच सध्या जी व्यवस्था आहे, ती पाच वर्षांसाठी आहे. राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे योग्य प्रकारे सांभाळत आहेत. शरद पवार त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहेत. सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन आहे.” असं म्हणत सरकार पडण्याची शक्यता संजय राऊत यांनी फेटाळून लावली.