दरभंगा (वृत्तसंस्था) आम्ही उज्ज्वला योजनेचीही घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत बिहारमधील जवळपास ९० लाख महिलांना लाकडाच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते दरभंगा येथील रॅलीत बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची दरभंगा येथे रॅली पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. प्रत्येक शेतकऱ्या थेट बँक खात्यात आम्ही मदत पोहोचवणार असल्याचे सांगितले होते. आतापर्यंत जवळपास एक लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. आम्ही उज्ज्वला योजनेचीही घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत बिहारमधील जवळपास ९० लाख महिलांना लाकडाच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे,असेही मोदी यावेळी म्हणाले. आम्ही प्रत्येक गरीब व्यक्तीला ५ लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार देण्याची घोषणाही केली होती. आज बिहारच्या प्रत्येक गरीब व्यक्तीला याचा लाभ मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या उभारणीवरून विरोधकांना टोला लगावला. आज सर्वांची नजर अयोध्येवर आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तपस्येनंतर आता राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजानं टाळ्या वाजवत आहेत, असे मोदी म्हणाले.