अमळनेर (प्रतिनिधी) लोकमान्य विद्यालयाचे शिक्षक भूषण सुरेश महाले यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या संस्थेतर्फे दरवर्षी देशाचे उज्वल भविष्य घडविणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त करण्यात येतो. भूषण महाले हे शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक कार्यही करत आहेत. मागील वर्षी भूषण महाले यांनी तंबाखू मुक्त शाळा अभियानांतर्गत सलाम मुंबई फाऊंडेशनचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेऊन भावी पिढी व्यसनमुक्त घडावी आणि समाज व्यसनापासून दूर रहावा तसेच अमळनेर तालुका तंबाखू मुक्त शाळांचा तालुका होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्षा संदिपा वाघ यांनी पुरस्कारासाठी निवड केली. पुरस्कार वितरण माजी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी गौरी उद्योग समूह आणि खान्देश मराठा-कुणबी पाटील समाज वधू-वर सूचक केंद्राचे संचालक सुमित पाटील, संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ, शिक्षक संदिप पाटील, ज्ञानेश्वर वाघ, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, कै.कवीवर्य नीळकंठ महाजन स्मृति प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष विजय लुल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. यापूर्वीही भूषण महाले यांना तीन राज्यस्तरीय तर दोन आंतरराष्ट्रीय कंपनी मायक्रोसॉफ्टतर्फे पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या निवडीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे यांनी कौतुक केले आहे, तसेच सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.