मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणासाठी राज्याच्या विविध भागात मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभर आंदोलन सुरु झाले आहे. दरम्यान, जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातही मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. पुण्या-मुंबईकडे जाणारा दूध पुरवठा आंदोलक रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव कार्यालयाबाहेर टॅंकर अडवणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ संघ कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्यात आले आहे. औरंगाबादेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन होणार आहे. ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. दोन्ही मंत्र्यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते ढोल वाजवणार आहेत.