अमळनेर(प्रतिनिधी) संगमनेर येथे महाराष्ट्र राज्य किसान काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन होते.त्यात महाराष्ट्र राज्य किसान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पराग पाश्टे व महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. त्यात जळगाव जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष कृषिभूषण सुरेशदादा पाटील यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरली. या बैठकीत सुरेश दादा पाटील यांनी बैठकीत मांडलेल्या मुद्द्यावरच जास्तीत जास्त चर्चा झाली.
बैठकीत सुरेश पाटील यांनी खालील मांडलेले मुद्दे
१)अमळनेर तालुक्यातील अवकाळी पावसामुळे 52 खेड्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा मांडला. तसेच फळबाग पिकांचे सण 2017 -18 व 2018 -19 या वर्षाचे थकीत अनुदानाची मागणी केली.
२) जिल्ह्यातील केळी पिकाच्या विमा संदर्भात त्वरित धोरण ठरवावे व अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यावर चर्चा झाली.
३) चालू वर्षात जिल्ह्यातील उडीद, मूग, सोयाबीन सारखया खरीप पिकां पासून शेतकऱ्याला दमडी मिळाली नाही. शासन आदेशानुसार पंचनामे झाले, परंतु अनुदानाचे काय ?असा प्रश्न उपस्थित झाला.
४)जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे “शेत शिवार रस्ते” खराब झाल्यामुळे कोणतेही वाहन वाहन शेतकऱ्यांच्या वावरापर्यंत जात नाही व त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा भर पडते. त्यासाठी जिल्ह्यातील तथा राज्यातील शेत शिवार रस्त्यांसाठी स्वतंत्र निधी मंजुरीची मागणी झाली.
५)तलाव, धरण इ. इ. साठी जवळच्या शेत जमिनीवर, कमांड एरिया नुसार सरकारी आरक्षण टाकले जाते. त्यामुळे खाते फोड करताना शेतकऱ्यांना अडचणी येतात म्हणून कमांड एरिया वरील आरक्षण रद्द करावे अशी मागणी झाली.
६) भूमापनची ब्रिटिश कालीन भूमापन पद्धत पूर्णता बंद करून, अद्ययावत पद्धतीने पूर्ण जळगाव जिल्ह्यातील शेतजमिनीची मोजणी शासनाने करावी त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधाच्या भान गळी पूर्णतः संपतील.
७)शेतीसाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठ्याचे भारनियमन कमी करावे. शेतकर्यांना रात्री ऐवजी दिवसा वीज मिळावी. आणि कृषीपंपासाठी, शेतीसाठी वीज कनेक्शन देणे सुरू करावे.
८)चालू वर्षासाठी शासनाने कापसाचा या वर्षाचा उत्पादन खर्च पाहून, कापसाच्या भावाचे धोरण ठरवावे, ते माध्यमांच्या सहाय्याने शेतकऱ्यांना अवगत करावे.
यासह अनेक मुद्दे सुरेशदादा यांनी लेखी व तोंडी सांगितल्याने त्यावर चर्चा झाली. त्यावेळी धुळे, जळगाव, पालघर, नाशिक, गोंदिया, नंदुरबार येथील किसान काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात नामदार बाळासाहेब थोरात यांनी, संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत करून आडवून अडचणी सोडवण्याचे स्पष्ट केले. तसेच सदर बैठकीत किसान काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्रचे सरचिटणीस युवराज पाटील, महाराष्ट्र राज्य किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष स.का. पाटील, अमळनेरचे बी. के. सूर्यवंशी, प्रा.कुंदन निकम, लक्ष्मीकांत पाटील यांची उपस्थिती होती.