धरणगाव (प्रतिनिधी) बचत गटांचे कर्ज माफ करावे, या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील नांदेड येथील महिलांनी तहसीलदारांना आज निवेदन दिले. तसेच मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा देखील दिला आहे.
ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांनी विविध बँक व खाजगी फायनान्सकडून कर्ज घेतलेले आहे. परंतू लॉकडाऊन काळात उत्पन्नाचे साधन नसल्याने कर्जाचे हप्ते खंडित झाले आहेत. लॉकडाऊनमुळे आमच्या हाताला असलेले काम बंद झाले. घरकाम करणाऱ्या आमच्या सहकारी महिलांचे घरमालकांनी कोरोनाच्या भीतीने काम बंद केले. तसेच अदानी, अंबानी सारख्यांचे कर्ज माफ केले जावू शकते, तर आमच्या सारख्या गरीब महिलांचे का नाही?. असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान, बचत गटांचे कर्ज जोपर्यंत माफ होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा निर्णय महिलांनी घेतला आहे. याबाबत त्यांनी तहसीलदार यांच्याकडे उपोषणास बसण्याची लेखी परवानगी मागितली. परंतू कोरोनामुळे प्रशासनाने ही परवानगी नाकारली आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर सामाजिक कार्यकर्त्या सरलाबाई पाटील, मरूबाई कोळी, उषा कोळी यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.