चाळीसगाव (प्रतिनिधी) खानदेशातील ग्रामीण भागात गणेशोत्सव, नवरात्री अथवा काही ठिकाणी स्थानिक यात्रोत्सवात तसेच कानबाईच्या थाट उत्सवात कधीकाळी हमखास दिसनारी आणि सध्या दुर्मीळ होत चाललेली कला म्हणजे वहीगायन. चाळीसगाव तालुक्यात अनेक वहीगायन मंडळांच्या माध्यमातून ही लोककला जपण्याचे काम सुरु आहे. सर्वांच्या आनंदात सहभागी होणारी ही कलावंत मंडळी मात्र स्वतः अतिशय खडतर परिस्थितीत राहून आपला चरितार्थ चालवतात. त्यांच्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून तसेच वैयक्तिक पातळीवर त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय, शैक्षणिक मदत देण्याचे आश्वासन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिले. ते चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथे खान्देश लोककलावंत विकास परिषद जळगांव आयोजित खान्देश वहीगायन लोककलावंत प्रसंगी बोलत होते.
मेळाव्याचे उद्घाटन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. जळगाव जिल्ह्याचे भूषण असणारे नगरदेवळा येथील शाहीर शिवाजीराव पाटील यांचे घर नैसर्गिक आपत्तीत पडल्याने त्यांच्या घराच्या बांधकामासाठी २५ हजार रुपयांची मदत आमदार चव्हाण यांनी सुपूर्द केली. सदर कार्यक्रमाला खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद ढगे, शाहीर शिवाजीराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, पंचायत समितीचे माजी सभापती संजू तात्या पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, महेंद्र अहिरे, लीलाधर (कारभारी) अहिरे, ओझर सरपंच सौ.वनाताई गायकवाड, भाजपचे दिनकर आबा पाटील, मोहन गुजर, सोशल मीडिया तालुकाप्रमुख बाजीराव अहिरे, विश्वनाथ गोलाईत, बापू पाटील, बाबुराव मोरे, संजय गुजर, जितेंद्र पाटील, मेहुणबारे येथील ज्ञानेश्वर भोई, डामरून येथील सुरेश पाटील, पाचोरा येथील युसुफ खाटिक, नारायण तात्या, दादाभाऊ पोरेकर, अखिल भारतीय सूर्यवंशी गुजर समाजाचे सर्व पदाधिकारी, चाळीसगाव तालुक्यातील वहीगायन मंडळ आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात तमाशा, लावणी, शाहिरी, भारुड, वाघ्या- मुरळी, गोंधळ यासारख्या लोककला प्रकारांना त्या-त्या भागात लोकमान्यता आणि लोकांनी उचलून धरल्यामुळे राजमान्यताही मिळाली. दुर्दैवाने वहीगायन या खानदेशी लोककला प्रकाराला लोकमान्यता मिळालेली नाही. या कलेच्या संवर्धनासाठी आता प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार चव्हाण यांनी केले.
सदर मेळाव्यामागची आपली भूमिका मांडताना विनोद ढगे यांनी सांगितले की, कुटुंबाचा वारसा म्हणून काही लोक या कलेचे जतन करत आहेत, तर काही तरुण आवड म्हणून सहभागी होत आहेत. जळगाव जिल्ह्यासह जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात जवळपास चार ते पाच हजार वहीगायन करणारे कलावंत असून त्यांना राज्य व केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ देण्यात यावा तसेच राज्याच्या सांस्कृतिक बजेटमध्ये उत्तर महाराष्ट्रासाठी कलावंत व लोककला संवर्धन यासाठी जास्तीत जास्त तरतूद करावी अशी मागणी त्यांनी केली.