मुंबई प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलांवरून मनसे आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली. ‘वाढीव वीज बिलातून सर्वसामान्यांना दिलासा द्या, अन्यथा उद्रेक होऊ जनभावनेचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा राज यांनी अदानीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
अदानी समूहाचे सीईओ शर्मा यांनी राज यांच्याशी चर्चा केली. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी या भेटीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. ‘करोनामुळं गेल्या काही महिन्यात लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. लोक अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहेत. रोजगाराचे साधन नाही, पगार कमी झाले आहेत. हे सगळं असताना विजेची बिलं जास्त आली आहेत. लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. पुढील दिवसांत बिलं कमी करून दिलासा दिला नाही तर लोकभावनेचा उद्रेक होऊ शकतो. त्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल, ती कोणाच्याच हातात राहणार नाही,’ हे राज यांनी अदानीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचं सरदेसाई म्हणाले.