जळगाव (प्रतिनिधी) ‘लाडकी बहिण’ योजनेंतर्गत जिल्हयातील साधारणतः १० लाख ५० हजार पेक्षा अधिक महिला पात्र असल्यातरी या महिलां पैकी डिसेंबर महिन्यात तब्बल १ लाख ८ हजार ९६ महिलांना हप्ता मिळाला नसल्याने महिलांकडून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. मात्र केवायसीमध्ये लाभार्थ्यांकडून चुका झाल्यामुळे गेल्या महिन्याचा लाभ हुकला आहे. मात्र लवकरच या चुका अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी करून दुरूस्त केल्या जाणार आहे.
विधानसभा निवडणुकांपुर्वी राज्यशासनाने महिलांसाठी ‘लाडकी बहिण’ योजना अंमलात आणली. यात दरमहा महिलांना १५०० रूपये खात्यावर दिले जातात. मात्र कालांतरानंतर शासनाने यात उत्पन्नाची अट व घरातील सदस्यांकडे चारचाकी वाहन असल्यास अपात्रची अट टाकल्यानंतर बऱ्याच महिलांचा पत्ता कट झाला. सध्या जिल्हयात साडेदहा लाख पेक्षा अधिक लाभार्थी असल्या तरी गेल्या महिन्यात या महिलांपैकी तब्बल १ लाख ८ हजार महिलांना लाभ न मिळाल्याने रोष व्यक्त केला जात आहे.
केवायसी करतांना झाल्या चुका
लाडकी बहिण योजनेसाठी ई केवायसी करण्यासाठी पोर्टल व मोबाईलवर लिंक देण्यात आली होती. त्यात बहुतांश महिलांनी केवायसी करतांना चुकीच्या ऑप्शनला क्लिक करत फॉर्म सबमिट केल्याने अनेक महिलांचा हप्ता या महिन्यात खात्यावर आलाच नाही.
अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी
राज्यात सर्वच जिल्ह्यात महिलांकडून ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ मिळाला नसल्याच्या तक्रारी येत आहे. त्यात जिल्ह्यात एक लाख पेक्षा अधिक महिलांना लाभ मिळाला नसला तरी आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या अपात्र ठरलेल्या लाभार्थीची पडताळणी करून त्याची माहिती भरून केवायसी दुरूस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. लवकरच या कामाला सुरूवात होणार आहे.
















