जळगाव (प्रतिनिधी) मराठी प्रतिष्ठान मार्फत नवीन वर्षात झिरो डाउन पेमेंट द्वारे जळगाव शहरासह जिल्ह्यामधील शंभर महिलांना ई रिक्षा उपलब्ध करून देणार असून जळगाव जिल्ह्यातील महिलांनी ई रिक्षा व्यवसायात पाऊल टाकावे व आर्थिक संपन्न व्हावे असे आवाहन मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.जमील देशपांडे यांनी केले आहे.
सदर ई-रीक्षांना परिवहन विभागाची मान्यता असून चार प्रवासी आसन क्षमता आहे. ई रिक्षाला प्रवासी वाहतुकीचे परमिट आवश्यक नाही.रिक्षा मीटर व लायसन्स मात्र गरजेचे आहे. शासकीय दरामध्ये लायसन्स सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार असून त्याकरता परिवहन विभागाचे सहकार्य असणार आहे.
तसेच ई रिक्षा चालवण्याचे सात दिवसाचे प्रशिक्षण सुद्धा मराठी प्रतिष्ठान तर्फे विनामूल्य देण्यात येणार आहे. ई रिक्षा करता राष्ट्रीयकृत बँकांतर्फे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून सर्व पाठपुरावा मराठी प्रतिष्ठान करणार आहे. ज्या महिलांना ई- रिक्षा घ्यायची असेल त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक झेरॉक्स सह मराठी प्रतिष्ठानच्या गणपती नगर येथील कार्यालयात संपर्क साधावा. आजपासूनच नाव नोंदणी सुरु करण्यात येणार असून प्रथम शंभर आलेल्या महिलांनाच ई रिक्षा देण्यात येईल अशी माहिती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.जमील देशपांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.